कोल्हापूर / प्रतिनिधी
सोमवारी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकावण्यात आले. कर्नाटकातील बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. या घटनेचा निषेध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी हे भव्य पोस्टर छत्रपती शिवाजी चौकात उभारण्यात आले.
कर्नाटकातील बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्राच्या सिमाभागात यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याच कालावधीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या कृत्याचा निषेध न करता अवमानकारक शब्द वापरल्याने मराठी भाषिकांसह विविध पक्ष- संघटनांच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध केला गेला. या निषेधाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात शहर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे भव्य पोस्टर उभारुन निषेध केला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी घोषणांसह वातावरण शिवमय झाले होते. यानंतर साऊंड सिस्टीमवर शिवरायाची महाआरती म्हणून शिवछत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. हा निषेध राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.