जिल्ह्यातील अंदाजे पाच लाख लाभार्थ्यांना होणार लाभ, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, कष्टकरी वर्गाचा समावेश
पुढील महिन्यापासून प्रणाली होणार कार्यान्वित, लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी शासनाचा प्रयत्न
प्रवीण देसाई / कोल्हापूर
सध्या हाताच्या अंगठ्याच्या ठसा ई-पॉस मशिनवर उमटविल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य मिळत आहे. परंतु ज्यांचे ठसेच उमटत नाहीत, त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाकडून रेशन दुकानदारांना पुढील महिन्यात `आय स्पॅनर मशिन’ दिली जाणार आहेत. यामुळे ठसे न अंदाजे पाच लाख लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गवंडी, पेंटर, सुतार, धुणे भांडी काम करणार्य महिला आदी कष्टकरी वर्गाचा समावेश आहे.
रेशनवरील काळाबाजार थांबावा व धान्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सरकारने फेब्रुवारी 2018 ई-पॉस मशिन प्रणाली कार्यान्वित केली. रेशनदुकानामध्ये धान्य आणायला गेल्यावर लाभार्थ्याने या ई-पॉस मशिनवर हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटविल्यानंतरच त्याला धान्य मिळत आहे. परंतु त्यामध्ये एक दुसरी समस्या निर्माण झाली ती अशी की, कुटूंबातील सर्वच सदस्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटतात असे नाही. कारण ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच कष्टाची कामे करणारे गंवडी, सेंट्रींगवाले, सुतार, कुंभार, पेंटर, धुणेभांडी करणार्या महिला यांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे या मशिनवर उमटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना रेशनवरील हक्काच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन अशा लाभार्थ्यांना धान्य मिळावे, यासाठी राज्य शासनाने `आय स्पॅनर मशिन’ ही प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये हाताच्या बोटाचे ठसे न उमटणार्यांच्या डोळ्यांचे स्पॅनिंग होणार आहे. याची पडताळणी होऊन खात्री झाल्यानंतर दुकादारांकडून या लाभार्थ्याला धान्य दिले जाणार आहे.
ही प्रणाली राज्य शासनाकडून प्रत्येक रेशन दुकानदाराला दिली जाणार आहे. पुढील महिन्यात ती कोल्हापूर जिह्यातील रेशनदुकानदारांना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे धान्यापासून वंचित राहणार्या घटकाला लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील अंदाजे पाच लाख जणांना होणार लाभ
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेतील 25 लाख 27 हजार 175 रेशनचे ग्राहक आहेत. त्यातील अंदाजे 5 लाख लाभार्थी हे गवंडी, सेंट्रींगवाले, सुतार, कुंभार, पेंटर, धुणेभांडी करणाऱ्या महिला असे ठसे न उमटणारे आहेत. त्यांना `आय स्पॅनर मशिन’चा लाभ होणार आहे.
राज्य शासनाने रेशन दुकानदारांना आयस्पॅनर मशिन देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. यामुळे ई-पॉस मशिनवर हाताच्या अंगठ्याचा ठसा न उमटल्याने धान्यापासून वंचित राहणार्या घटकाला न्याय मिळणार आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळेल. शासनाने लवकरात लवकर ही मशिन दुकानदारांना द्यावीत.
-रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर रेशन दुकानदार संघटना