कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
पोलीस- आंदोलकांमध्ये झटापट
दोन दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाजातील विद्यार्थ्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी. पुढील काळात होणार्या सर्व शासकीय भरतींना स्थगिती द्यावी. यासंदर्भातील आदेश तत्काळ काढण्यात यावा. तसेच पुढील दोन दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करत पहिल्या टप्प्यात मुंबईला होणार दूध पुरवठा रोखण्याचा इशारा कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाने दिला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्ते तावडे हॉटेल चौकातून पंचगंगा नदीवरील पुलाची शिरोली पुलाकडे आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलकांना महामार्ग रोखू नका, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असो आवाहन केले. मात्र संतप्त आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलीसांनी त्यांनी रोखले. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.
आंदोलनात सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, रवींद्र मुतगी, राजेंद्र चव्हाण, सुनीलसिंह चव्हाण, उदय प्रभावळे, नितीन देसाई, समरजित तोडकर, योगोश भोसले, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, प्रसाद पाटोळे, सम्राट शिर्के, रवींद्र राणे आदींसह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
नीट परीक्षेमुळे आंदोलन एक तास पुढे
मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणासाठी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र रविवारी नीटची परीक्षा होती. आंदोलनामुळे परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये या करीता आंदोलन एक तास पुढे ढकलण्यात आले. सकाळी 11 वाजात करण्यात येणारे आंदोलन दुपारी 12 वाजता करण्यात आले.
महामार्गावर तणाव अन् प्रचंड पोलीस बंदोबस्त
राष्ट्रीय महामार्ग रोकण्याच्या इशार्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर तावडे हॉटेल येथे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, करवीरचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलीस अधिकारी किरण भोसले, सुशांत चव्हाण, मंडल अधिकारी शिवकुमार पाटील आदींसह सुमारे 250 ते 300 पोलीस आंदोलनस्थळी होते.