वारणानगर येथे चार दिवसापूर्वी घडला होता अपघात
प्रतिनिधी/वारणानगर
येथील रिक्षा थांब्याजवळील गतीरोधकावरील बसलेल्या धक्याने मोटरसायकल वरून खाली पडून जखमी झालेल्या अध्यापिकेचे उपचारा दरम्यान आज बुधवारी (दि. १७) खासगी हॉस्पीटलमध्ये निधन झाले. वनिता सुनिल जाधव (वय ३७, रा. बहिरेवाडी ता. पन्हाळा) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, बहिरेवाडी येथून कोडोली ता. पन्हाळा येथील एलआयसी विमा शाखेत बैठकीच्या निमित्ताने रविवारी (दि. १४) सकाळी ११ वा. पती सुनिल सोबत मोटरसायकलवरून जात असताना वनिता यांचा वारणानगर येथे अपघात झाला होता. यात वनिता यांच्या डोक्यात व पायास गंभीर इजा झाली होती. यानंतर त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज, बुधवारी दुपारी त्या हॉस्पिटलमध्ये भोवळ आल्याने पडल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे आज दुपारी निधन झाले. याबाबतची वर्दी प्रशांत पंडित जाधव यांनी कोडोली पोलिसात दिली.
वनिता या मलकापूर येलूर येथील शोभाताई कोरे महिला महाविद्यालयात अध्यापिका होत्या. त्यांना दोन मुले असून मुलगा तिसरीत शिकत आहे. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास सुरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
धोकादायक गतीरोधक……….
वाठार ते कोडोली या मार्गावर सुमारे बरेच गतीरोधक नवीन निर्माण केले आहेत मात्र त्याला पांढरे पट्टे न मारल्याने हे स्पीड ब्रेकर आहेत ते प्रवाशांना दिसत नाहीत. त्यामुळे असे अपघात सातत्याने घडत आहेत. संबंधित विभागाने पुढे गतिरोधक असल्याच्या सूचना फलक लावावेत पांढरे पट्टे मारावेत अन्यथा गतीरोधक काढून टाकावेत अशी मागणी प्रवाशी नागरीकातून होत आहे.