पुलाची शिरोली / वार्ताहर
अमित रमेश नाईक – राठोड याच्या खून प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीसांनी योगेश साखरे ( वय २० ) व समीर उर्फ नॉटी नदाफ ( वय २०, दोघेही रा. गांधीनगर ) यांना अवघ्या पाच तासांत अटक केली. पेठवडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोरील न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार ता. ८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
पूर्ण नशेत असणार्या या संशयितांनी अमित राठोडने दारूची बाटली देण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर वादाला सुरुवात केली. या वादातच जून्या एका वादाची ठिणगी पडली आणि योगेशने खिशातील चाकू काढत अमितच्या शरीरावर सपासप वार केले. नशेत तर्रर्र होवून केलेल्या या खूनाचा संबंधित संशयितांवर कोणताही लवलेश दिसत नाही. उलट ते केलेल्या कृत्याचे समर्थन करीत आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी , फिर्यादी आदित्य उर्फ गणपत भिकाजी पाटील ( वय १७ वर्षे ९ महिने ), शुभम गव्हाणे, दत्तू भाकरे, रवी गोसावी व दिनेश गोसावी ( सर्वजण रा. पुलाची शिरोली ) हे नशा पार्टी करण्यासाठी पंचगंगा नदी काठावर असणार्या दर्ग्याच्या मागील पोवार यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी समीर नदाफ व योगेश साखरे अगोदरच तेथे दारू पीत बसले होते.
अमित हा दोन्ही ग्रुपचा कॉमन मित्र होता. तोही थोड्या वेळात तेथे आला. त्यावेळी समीरने अमितला बोलावून दारू मागितली. यामुळे समीर व अमित यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. या वादात योगेश साखरे याने अचानक एन्ट्री घेत अमितला मारहाण सूरू केली. पण मारामारीत अमित हा योगेशला भारी पडल्याने योगेशने खिशातील चाकू काढत अमितच्या शरीरावर सपासप वार केले. यामध्ये अमित गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. अमितची मृत अवस्था पाहून समीर व योगेशने पळ काढला.
मात्र शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले यांनी आपल्या टीमच्या साह्याने अवघ्या पाच तासात गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.