गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आलेली कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा १७ जुलैपासून पुन्हा नियमित सुरू होत आहे. आठवड्यातील तीन दिवस मंगळवार, गुरुवार व शनिवारी नियमितपणे विमानसेवा सुरू होणार असून अहमदाबाद वरून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर साठी विमानाचे टेक-ऑफ होणार असून १० वाजून १० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर विमान लँडिंग करेल.
पुन्हा १० वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूरहून अहमदाबादकडे विमान टेक ऑफ करेल ते ठीक १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावर लँडिंग करेल. अडीच महिन्यांपासून खंडित असलेल्या अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व परिसरातील व्यापारी उद्योजक यांची सदर विमानसेवा पुन्हा सुरू करण्याविषयी मागणी होती .कोल्हापूर परिसरातील व्यापारी उद्योजक जगताकडून या विमान सेवेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सदर विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे संबंधितांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.