शेंडा पार्क येथील मायक्रोबॉयालॉजी विभागात लॅब, ‘आरटीपीसीआर’मध्ये एकावेळी 96 स्वॅब चाचणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लॅबला परवानगी मिळाली, सीबीनॅट यंत्रणेपाठोपाठ रिव्हर्स ट्रान्सक्विरेटेड पॉलिमरेज चेन रिऍक्शन (आरटीपीसीआर) लॅब तयार झाली आहे. बुधवारी येथे मिरज येथील 10 स्वॅबची चाचणी घेण्यात आली. त्याचे रिपोर्ट जुळल्यानंतर शनिवारपासून या लॅबमध्ये कोल्हापुरातील स्वॅबची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीवाणू तपासणी प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. येथील मायक्रो बॉयालॉजी विभागात आरटीपीसीआर लॅबची उभारणी पूर्ण झाली आहे. येथे 1 कोटींची सीबीनॅट यंत्रणा दाखल झाली आहे. पण कार्टेजची मर्यादा असल्याने त्यावर हायरिस्क रूग्णांच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे. सप्ताहभरापासून येथील स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. जिल्हय़ातून पाठवलेले सुमारे दीडशे स्वॅब रिपोर्ट अद्यापी प्रलंबित आहेत.
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेवर स्वॅब तपासणीचा ताण आहे. एकावेळी येथे 72 स्वॅब टेस्ट होतात. त्यामुळे अन्य प्रलंबित रहात आहेत. दोन दिवसांपुर्वी मिरजला पाठवलेल्या स्वॅबपैकी 61 जणांचे रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आले. आकुर्डे येथील चालकाचा स्वॅब फक्त पॉझिटिव्ह आला आहे. मिरजच्या लॅबकडे कोल्हापूरसह, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील स्वॅब तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे स्वॅब तपासणीला उशीर होत आहे. रिपोर्ट उशिरा मिळत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील स्वॅब लवकर सुरू होणे आवश्यक बनले आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमध्ये बुधवारी मिरजहून आणलेल्या 10 स्वॅबची चाचणी घेण्यात आली. या लॅबमध्ये एकावेळी 80 ते 96 पर्यत स्वॅब तपासले जातात. त्यासाठी साधारणतः सहा तास लागतात. मिरजहून आणलेल्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्यांच्या रिपोर्टला येथील रिपोर्ट जुळतो का, हे पाहिले जाणार आहे. गुरूवारपर्यत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून जिल्हय़ातील कोरोना संशयितांचे स्वॅब या आरटीपीसीआर लॅबमध्ये तपासले जाणार आहेत. त्यामुळे संशयितांचे स्वॅब रिपोर्ट लवकर मिळण्यास मदत होणार आहे.