सचिव उज्वला पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ आशा व गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवार 24 रोजी लाक्षणिक देशव्यापी संप करण्यात येणार आहे. अशी माहिती आशा व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हा सचिव उज्वला पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, आशा व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचाया प्रमाणे राबविले जात आहे. परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना कामावरुन काढून टाकण्याची अधिकारी धमकी देतात तर सर्वेक्षणाला गेल्यावर त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले आहेत.
कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱया या आघाडीच्या कामगारांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना गरजेपुरता मोबदला दिला जात नाही. भयंकर महामारीत काम करताना कांहीनां प्राण गमवावे लागले. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, त्यांची मुले पोरकी झाली. तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.
आशा व गट प्रवर्तकानां शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान 22 हजार रुपये वेतन द्यावे. अशी मागणी सिटू करीत असून राज्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकानी या लाक्षणिक संपात सहभाग घ्यावा. असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.