प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील सोडगे माळ्यातील अलिम रशीद गदवाल यांच्या खून प्रकरणी आणखीन दोघा संशयीत आरोपीना पोलिसांनी अटक केली. कृष्णा रामचंद्र चव्हाण (वय 28, रा. संगमनगर, खोतवाडी), संजय बबन गोंदकर (वय 35, रा. रेणूकानगर, यड्राव, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यामुळे या खूनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयीत आरोपीची संख्या तीन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या आठवड्यात सायकल चोरल्याच्या संशयावरून मृत अलिम गदवाल यांचे अपहरण करून त्याला बेदम मारहाणीत केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या गुंड अल्ताफ मिरासाहेब शेख (रा. संगमनगर, खोतवाडी, ता. हातकणंगले) याला त्वरीत अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत आली असताना पोलिसांनी कृष्णा चव्हाण (रा. संगमनगर , खोतवाडी), संजय गोंदकर (रा. रेणूकानगर, यड्राव, ता. शिरोळ) या दोघा संशयीताचा शोध घेवून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.