प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील शहापूर पोलिसांनी अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेता मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बराच वेळ ताटकळत बसविले. या घडलेल्या घटनेची माहिती समजताच संतप्त झालेल्या एका गटाने काल, शुक्रवारी रात्री शहरातील डेक्कन चौकातील हातगाड्याची तोडफोड केली. या प्रकाराने या चौकात रात्री काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
शहरानजीकच्या एका नगरातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका गटाच्या युवकाने अपहरण केले. या घटनेची माहिती समजताच संबंधीत मुलीच्या पालकांनी शहापूर पोलीस ठाण्यात त्वरीत धाव घेतली. मुलीचे अपहरण झाल्याबाबतची ठाणे अंमलदाराकडे तक्रार नोंद करुन घेण्याबाबत विनंती करू लागले. पण ठाणे अंमलदाराने या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेता याकडे दुर्लक्ष करीत संबंधीत मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बराच वेळ ताटकळत बसविले. या घडलेल्या गंभीर घटनेची माहिती समजताच संतप्त झालेल्या एका गटाने शहरातील डेक्कन चौकात उभा केलेल्या हातगाड्याकडे वळविला. त्यांनी रस्त्याकडेला लावलेल्या हातगाड्या भररस्त्यावर आणून त्यावर मोठे दगड घालून फोडून टाकल्या. हातगाड्याच्या तोडफोडीच्या घटनेने इचलकरंजी हातकणंगले मार्गावरील सर्व वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जमावाला शांत करीत मुलीच्या अपहरणा बाबतची तक्रार नोंद करून, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याविषयी आश्वासन दिले . त्यानुसार गुरुवारी रात्री अपहरण झालेल्या ‘ त्या ‘ अल्पवयीन शाळकरी मुलीविषयी शुक्रवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपहरण केलेल्या त्या युवकाचा शोध सुरु केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.