गॅस नोंदणीस सुरुवात; माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची माहिती
राजेंद्र होळकर / इचलकरंजी :
केंद्र सरकारने सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन स्कीम अंतर्गत इचलकरंजी शहरात घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस योजना मंजूर केली. त्यामुळे या योजनेतून घरोघरी गॅस जोडणी देण्यास लवकरच सुरुवात होत असून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणीची सुरुवात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा फॉर्म भरून करण्यात आली.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे माजी आमदार हाळवणकर यांनी डिसेंबर २०१८ मध्ये सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन योजनेत इचलकरंजी शहराचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये या योजनेत शहराचा समावेश होऊन एचपीसीएल आणि ओआयएल इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांनी एचपी ओआयएल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना इचलकरंजी शहर तसेच परिसरामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरण पूरक इंधन वितरण करण्यासाठी करण्यात आली आहे.
कंपनीची मुख्य गॅस वाहिनी दाभोळ येथून येत असून दक्षिणेमध्ये जाते. पेठवडगाव येथे वितरण केंद्र असून हातकणंगले मार्गे इचलकरंजी शहरात लवकरच मुख्य वाहिनी टाकली जाणार आहे. इचलकरंजी शहरातील प्रशासकीय वार्ड क्रमांक ५, ७, २, ११, १७, १८ आणि २० मध्ये पहिल्या टप्प्यात गॅस जोडणी घरोघरी देण्यात येणार आहे. सध्या कंपनी ६१८ रुपये इतके डिपॉझिट भरून घेऊन गॅस जोडणीसाठी फॉर्म भरून घेत आहेत. मार्च ते एप्रिल २०२१ या कालावधीत गॅस पुरवठ्याला सुरुवात होईल. याबाबत कंपनीने विहित खुदाई शुल्क ४.५ कोटी इतके नगरपालिकेकडे भरलेले आहे. १०७ कोटीच्या रस्ते प्रकल्पातून करण्यात आलेल्या रस्त्यांवर खुदाई होणार नाही अथवा कमीत कमी खुदाई होईल याबाबत दक्षता नगरपालिकेकडून घेण्यात आली आहे.
सिलेंडरपेक्षा स्वस्तात गॅस
सध्या वापरला जाणारा घरगुती सिलेंडर १४.२ किलो असतो. त्यापैकी काही गॅस द्रव स्वरुपात असतो. तर बराच गॅस वापरा दरम्यान वाया जातो. त्या तुलनेत पाईप मधून येणारा गॅस बराच परवडतो. एका सिलेंडर इतका गॅस पाईपमधून वापरण्याचा खर्च केवळ 440 रुपये इतका येईल.
सुलभ जोडणी
कनेक्शन खर्च ६१८ रू. असून एकत्रितरीत्या अथवा हप्त्याने शुल्क भरता येते. त्यापैकी नोंदणी खर्च ११८ रुपये असून तो विना परतावा आहे तर ५०० रुपये डिपॉझिट आहे. असे एकूण ६१८ रुपये भरून नोंदणी अर्ज स्वीकारला जातो.
नोंदणीनंतर गॅस कनेक्शन जोडणीच्यावेळी बर्नर, नॉब, मीटर, फिटींग व १० मीटर जीआय पाईप व १० मीटर कॉपर पाईप देण्यात येईल. गॅस जोडणी झाल्यानंतर पहिले दोन महिने बिल भरावे लागणार नाही. त्यानंतर एक वर्ष बिलांमध्ये बिल व डिपॉझिटचे ५०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यानंतर केवळ बिल द्यावे लागेल. सुरुवातीचा जोडणी खर्च चेकद्वारे अथवा गुगल पेवर ऑनलाईन अदा केला जाऊ शकतो.
पाइपद्वारे गॅसचे फायदे
सिलेंडरच्या तुलनेत पाइपद्वारे गॅस वापरल्यास अनेक फायदे होतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गॅस सिलेंडरची वाहतूक व श्रम कमी होतात. एलपीजी गॅसच्या तुलनेत पाईप मधून येणारा मिथेन गॅस कमी प्रदूषणकारक असतो. त्यामुळे केंद्र सरकारचा पाईप मधील गॅस वापरण्यास प्राधान्यक्रम आहे. एखाद्या महिन्यात वापर बंद राहणार असेल तर कंपनीला तसे कळवल्यास त्या महिन्याचे कोणतेही बिल येणार नाही.