प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. बुधवारी दुपारपर्यंत ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर लिगाडे मळा येथील १६ वर्षीय युवकासह दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६ वर पोहचली असून हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वाढत्या मृत्यूदराबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहरात दुपारपर्यंत विविध भागांतील ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात भोने माळ येथील ५ जणांचा तर गणेशनगर, बोहरा मार्केट, पाटील मळा, लिगाडे मळा भागातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यात भोने माळ येथील एकाच कुटुंबातील चौघांना तर वस्त्रोद्योगातील यंत्रमाग कारखानदारांच्या एका नेत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
तर यातील पाटील मळा येथील ७८ वर्षीय वृद्धाचा आयजीएम रुग्णालय येथे तर लिगाडे मळा परिसरातील १६ वर्षीय युवकाचा मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. कोरोनाने १६ वर्षीय युवकाचा बळी घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांवरही योग्य ती खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी दिली.