जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीतेच्या नातेवाईकांना संशयिताकडून शिवीगाळ
गुन्ह्याची चाहुल लागताच संशयीताचे इचलकरंजीतून पलायन
घटनेची गांभीर्याने दखल घेवून संशयिताला जेरबंद करण्यासाठी पोलिसांचा त्यांच्या घरावर छापा
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीमध्ये सोळा वर्षीय बालिकेवर एका युवकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घडल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांनी संशयिताला जेरबंद करण्यासाठी त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला पण पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला. अविनाश टेकाळे (वय २१, रा. जयभिमनगर झोपडपट्टी इचलकरंजी ) असे संशयिताचे नाव आहे. तसेच या संशयिताने जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत बालिकेच्या नातेवाईकांना शिवीगाळ देखील केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यांची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, पिडीत बालिकेचे आई-वडील मोलमजूरी करतात तर तिच्या भाऊ आणि बहिण दिवाळीच्या सणानिमित्याने आजोळी गेल्याने पिडित बालिका घरी एकटीच होती. यांची संधी साधून संशयिताने तिच्या घरी प्रवेश करून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. हा घडला प्रकार पिडीतेने आई-वडील कामावरून आल्यानंतर त्यांना सांगितला. त्यानंतर पिडीतेचे आई-वडील जाब विचारण्यासाठी टेकाळेच्या घरी गेले असता त्यांने त्यांना शिवीगाळ केली.
या प्रकारानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी पिडीतेसह शिवाजीनगर पोलिसात धाव घेवून फिर्याद दाखल केली. या घडल्या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून, टेकाळेच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. पण तो पोलीस येण्यापूर्वीच घरातून पसार झाला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील करीत आहेत .