हल्ल्यात दोन्ही बालके गंभीर जखमी, उपचारासाठी दाखल केले आयजीएम रुग्णालयात
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याची घटना
प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील जवाहरनगरमध्ये मंगळवारी सकाळी भटक्या कुत्र्याने दोन बालकांना चावा घेवून गंभीर जखमी केले. अरफान रफिक बागवान (वय अडीच वर्षे, रा. मासाळ गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी), आदित्य अनिल शिरगावे (वय सहा वर्षे, रा. स्वामी कारखान्यानजीक, जवाहरनगर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही जखमी बालकांना उपचाराकरिता आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, अरफान बागवान, आदित्य शिरगावे ही दोन बालके घरासमोर खेळत बसली होती यावेळी एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्या किंचाळलेल्या आवाजाने त्याच्या घरातील आणि शेजारील नागरीक घराबाहेर आले. कुत्र्याच्या तावडीतून त्यांची सुटका केली. तोपर्यत कुत्र्याने बालकांच्या मांडी, छाती, हाताचे लचके तोडून गंभीर जखमी केले. या जखमी बालकाना नातेवाईकांनी उपचारासाठी आयजीएम दाखल केले आहे. या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याने जवाहरनगरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.