राजेंद्र होळकर / इचलकरंजी
लॉकडाऊन असतानाही मास्क न घालता विनाकारण इचलकरंजीतील रस्त्यावर दुचाकीवरुन फिरणे शहरातील एका युवा नेत्याला चांगलेच महागात पडले. महेश आप्पासो माळी (रा. लिगाडे मळा, जवाहरनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला नाकाबंदीवरील महिला पोलिसांनी मास्क न घालता कोणत्या कामाकरीता फिरत आहात असे विचारले असता, त्याने बंदोबस्तावेळी महिला पोलिसांच्याबरोबर चांगलीच हुज्जत घातली. मी कोण आहे हे तुमची वर्दी उतरुनच दाखवितो, अशी धमकी ही या युवा नेत्याने महिला पोलिसांना दिल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना महेश माळी याला त्वरीत ताब्यात घेत, त्याच्या विरोधी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती समजताच शहरातील आजी-माजी नगरसेवकाच्यासह त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. ही घटना स्टेशन रोडवरील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या स्टेशन समोरील पोलीसाच्या तपासणी नाक्यावर घडली आहे.