पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दुबईत कांस्यपदक; स्पेनच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची तयारी सुरू
वार्ताहर / उचगाव
उचगाव ता. करवीर येथील आरती ज्ञानोबा पाटील या दिव्यांग असलेल्या मुलीने दुबई येथे पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. एका गवंडी कामगारांच्या मुलींच्या यशाने उचगावमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर विविध देशातंर्गत स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
पॅरा बॅडमिंटनपटू आरती ज्ञानोबा पाटील (वय-२४) ही जन्मापासून डाव्या हाताने दिव्यांग आहे. बॅडमिंटन खेळत असताना ती उजव्या हाताचा वापर करते. जन्मजात दिव्यांगावर मात करत २९ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २१ रोजी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले आहे. पॅराबॅडमिंटन जागतिक फेडरेशनच्या महिला एकेरी क्रमवारीत ती १४ व्या स्थानावर आहे. तर स्पेन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
ठाणे (मुंबई) महानगरपालिकेच्या सय्यद मोढी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. आंतरराट्रीय स्तरावर कामगिरी करत आरतीची सुरुवातीला कोल्हापूर येथे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत होती नंतर २०१८ मध्ये ती सोलापूर येथे सुनील देवांग बॅडमिंटन अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आली आहे.
आतापर्यत आरतीने राज्यस्तरीय २ सुवर्णपदके आणि राष्ट्रीय स्तरावर १२ स्पर्धामध्ये १० सुवर्ण, ४ रौप्य, आणि ८ कांस्यपदक जिंकली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने ३ पदके पटकवली आहेत. २०१७ मधील एशियन युथ पॅराबॅडमिंटन, २०१८ मधील व्हिक्टर डेन्मार्क पॅराबॅडमिंटन, २०१९ मधील युगांडा पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेतील पदकांचा यात समावेश आहे. तसेच २०१९ मधील टोटल बिडबल्यूएफ पॅराबॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि जपान पॅराबॅडमिंटन इंटरनॅशनल २०१९ मध्ये देखील ती सहभागी झाली होती.
स्पेन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफाय १० मे २१ ते १६ मे २१ या कालावधीत स्पर्धा होत आहेत. त्यामध्ये ती सहभागी झाली आहे. त्याबरोबर आयर्लंड येथे आतंरराष्ट्रीय स्पर्धा २१ जून २०२१ ते २७ जून २१ या कालावधीत होणार आहेत. त्यामध्येही तिने सहभाग घेतला आहे. तिला आतापर्यंत अनेकांनी मदतीचा हात दिला आहे.
“आर्थिक मदतीचा हवाय हात”
माझे वडील व भाऊ गवंडी कामगार आहेत. आई गृहिणी आहे. देश परदेशात सहभागी होऊन मी चांगली कामगिरी करत आहे. आर्थिक परिस्थिती आडवी येत असल्याने खर्च परवडत नाही. जनसामान्य लोकांनी, दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक पाठबळ दिले तर नक्कीच मला पुढे चमकदार कामगिरी करता येईल. त्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे. शासनानेही खेळाडू नोकर भरतीतून मला नोकरी द्यावी.
आरती पाटील (पॅरा बॅडमिंटनपट्टू)