प्रतिनिधी / वारणानगर
ऊस तोडणी साठी मजुरांची टोळी देतो म्हणून १२ लाख रुपये घेऊन आठ महिन्यापूर्वी फरार झालेल्या रहिमान सिकंदर शेख (वय३६) रा.जत याच्या कोडोली पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या. सातवे (ता.पन्हाळा) येथील युवराज मानसिंग पाटील याने याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, युवराज हा साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्याचे कंत्राट घेत असतो. यासाठी राहिमान शेख याने आठ महिन्यापूर्वी युवराज यांचेकडून १२ लाख रुपये घेवून ऊस तोडणी मजूर देतो म्हणून तो जत येथे जाऊन येतो म्हणून गेला होता तो परत आला नाही. त्याच्याशी युवराजने फोनवरून संपर्क साधला असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तीन महिन्यापूर्वी युवराजने याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उप-निरीक्षक सागर पोवार, नामदेव सुतार, सागर जाधव या पथकाने शेख याच्या मोबाईल लोकेशन वरून जत तालुक्यातील उंडगी या गावात लपून बसलेला शेख याला ताब्यात घेऊन अटक केली.