पाच उत्पादक कंपन्यांमधून होतेय निर्मिती, दररोज 40 मेट्रीक टनची मागणी
40 टक्के बाहेरील पुरवठय़ासाठी रहावे लागयत अवलंबून
प्रवीण देसाई / कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ऑक्सिजनची मोठय़ा प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. यामध्ये जिल्हयाला दररोज सरासरी 40 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत आहे. यातील 60 टक्के गरज ही जिल्ह्यातील पाच उत्पादक कंपन्यांद्वारे भागविली जात आहे. तर उर्वरीत 40 टक्के ऑक्सिजनसाठी बाहेरील पुरवठय़ावर अवलंबून रहावे लागत आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी रुग्णालये, कोविड सेंटर आदी ठिकाणी रुग्णांसाठी सुमारे 4 हजार बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यात ऑक्सिजेनेटेड व व्हेंटिलेटर बेडचा ही समावेश आहे. सध्या मोठय़ा प्रमाणात रुग्णांसाठी ऑक्सिजन लागत आहे. दिवसाला सरासरी 40 मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्हयासाठी लागत आहे. यातील 60 टक्के ऑक्सिजनची निर्मिती ही कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर ऑक्सिजन, के इंडस्ट्रिज प्रा.लि., महालक्ष्मी गॅसेस, यड्राव, धवल प्रा. लि., बी.व्ही. गॅस प्रा.लि., या पाच कंपन्यांमधून होत आहे. यातील कोल्हापूर ऑक्सिजन, के इंडस्ट्रिज प्रा.लि., महालक्ष्मी गॅसेस हे नियमित उत्पादक आहेत. त्यांना ऑक्सिजन तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणजे द्रव्य ऑक्सिजन हा पुणे, रायगड येथून आणावा लागतो.
जिल्हयातील ऑक्सिजन उत्पादन करणार्या कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत 60 टक्के ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. परंतु उर्वरीत 40 टक्केसाठी शर्थीचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या जसजशी वाढत जाणार आहे. त्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणीही वाढणार आहे. तसेच पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी ही येत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे कोणत्याही चुकीच्या घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासनाकडून प्राधान्याने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या जे ऑक्सिजन निर्मिती करत आहेत त्या औद्योगिक कंपन्यांना ही परवाने दिले जात आहेत.
बाहेरुन येणार 25 मेट्रीक टन ऑक्सिजन
एकूण मागणीच्या 40 टक्के ऑक्सिजन हा पुणे, रायगड येथून आणावा लागत आहे. यातील सुमारे 25 मेट्रीक टन ऑक्सिजन हा दोन दिवसात जिल्ह्यात दाखल होणार आहे. यामध्ये महालक्ष्मी गॅसेस येथे 15 मेट्रीक टन, धवल प्रा. लि. येथे 5 मेट्रीक टन, बी.व्ही. गॅस प्रा.लि. येथे 5 मेट्रीक टन ऑक्सिजन येणार आहे, असे सुत्राकडून सांगण्यात आले.
रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटसाठी परवानगीची गरज नाही
ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता कोल्हापूर शहरातील अथायू रुग्णालय व ऍपल सरस्वती रुग्णालयांनी स्वतःचे ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. अशा पध्दतीने रुग्णालयांनी स्वतः प्लांट उभारल्यास त्यांना अन्न व औषध विभागाकडून परवानगीची गरज नाही. परंतु त्यांनी निर्मित केलेला ऑक्सिजन हा स्वतःच्या रुग्णालयासाठीच करता येणार आहे. त्यांना या ऑक्सिजनची बाहेर विक्री करता येणार नाही, असे सांगण्यात आले.
ऑक्सिजनचे जिल्ह्यात बारा वितरक
जिल्ह्यात ऑक्सिजनचे वितरण करण्यासाठी बारा वितरक नेमले आहेत. त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार आणखी काही जणांना परवानगी दिली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
अवाजवी दर आकारल्यास कारवाई
शासनाकडून ज्या प्रमाणे औषधांच्या किंमती निश्चित झाल्या आहेत. त्याप्रमाणे ऑक्सिजनच्या किंमतीबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश नाहीत. तरीही अशा युध्दजन्य परिस्थितीच्या काळात ऑक्सिजनसाठी अवाजवी दर आकारल्यास संबंधितांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.