नंदकुमार तेली / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गावर नियंत्रणासाठी शहरासह उपनगरात घरोघरी जाऊन सर्व्हे व नागरिकांचा तपासणी मोहिम महानगरपालिकेने राबविली. या अंतर्गत नागरिकांची तपासणी, सर्व्हे, फिरता दवाखाना आदींच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सेवा देत कोरोना `योध्दया’ची भूमिका बजावली. सध्या मनपाच्या परिवहन विभागात सुमारे 200 पेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. अल्पशा मानधनात आपला जीव धोक्यात घालून त्यांनी वैद्यकीय सेवेबरोबर इतर कामातही पॉझिटिव्ह कार्याचे योगदान दिले आहे. आजअखेर यापैकी एकही कर्मचारी आढळलेला नाही कोरोना `पॉझिटिव्ह’.
कर्मचाऱ्यांना `आरोग्य विमा कवच’
कोरोना महामारीच्या काळात कंत्राटी कर्मचाऱयांनी पुढाकार घेऊन रुग्णांना वैद्यकीय सेवेसह इतर सेवा दिली आहे. यासाठी मनपा प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विमा, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तत्काळ स्वॅब तपासणी व वैद्यकीय कीट असे `आरोग्य विमा कवच’ दिले. प्रकल्प अधिकारी पी.एन.गुरव व कंडक्टर-ड्रायव्हर विभागाचे रवि डुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी मनपाच्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये वैद्यकीय सेवा, वैद्यकीय पथकांना सहाय्यक म्हणून अविरत सेवा बजावत आहेत.
कंत्राटी कर्चचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान : तन्मय वेल्हाळ (परिवहन तिकीट विभाग : टेक्नीकल इंजिनिअर)
कोरोना महामारीच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये रुग्णांना ने आण करणे, औषधांचे वाटप करणे, शहर-उपनगरामध्ये घरोघरी जाऊन सर्दी-खोकला असणाऱ्या रुग्णांचा सर्व्हे करणे, फिरत्या रुग्णवाहिकेतून खोकल्याच्या सर्दी-खोकला आदींसह इतर औषधांचा पुरवठा, बसमधून वैद्यकीय पथकांना हॉट स्पॉटच्या ठिकाणी नेऊन वैद्यकीय सेवा देण्यासाठी मदतनीस म्हणून सेवा, जकात नाक्यांवर आरोग्य पथकांना सहाय्यक म्हणून मास्क, प्रवाशी नागरिकांची स्क्रिनिंग तपासणी करणे, स्क्रिनिंग तपासणी झाल्यानंतर मनपाने उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी दाखल करणे, त्यांना विविध सेवा सुविधा पुरविणे आदी कामांचा समावेश आहे. तसेच मनपाने मानधन तत्वावर संगणक ऑप्रेटर्स नेमलेले होते. या कंत्राटा कामगारांनी मानधन तत्वावर काम केले असून दिवस जितके भरतील त्यानुसार त्यांना कमी-अधिक या प्रमाणात मानधन मिळाले आहे.
रुग्ण व नातेवाईकांतून समाधान
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शहर व उपनगरातील रुग्णांना कंत्राटी कर्मचारी अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत. स्वत:ची दक्षता घेऊन रुग्णसेवा देणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी आजअखेर एकही कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळलेला नाही, ही जमेची बाजू आहे. भविष्यातही रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात हे कर्मचारी कार्यमग्न राहणार आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याबद्दल नागरिकांसह कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.