नवदुर्गा मेळाव्यात शौमिका महाडिक यांनी फुंकले रणशिंग
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशातील प्रमुख सत्ताकेंद्र यासह राज्यातील लहान-मोठी सत्ता स्थाने ताब्यात असलेली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा काबीज करेल आई अंबाबाईला कमळ प्रिय आहे म्हणून तिचा आशीर्वाद घेऊनच आजपासून कामाला सुरुवात केली आहे.
नव्या जोमानं पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोचवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित नवदुर्गा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे होत्या. महाडिक म्हणाल्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद होतं अनेक नगरपंचायती नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात दोन आमदार पक्षाचे होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला राज्यातील जनतेचा कौल असूनही सत्ता मिळाली नाही ही खंत आहे. परंतु, आता पुन्हा नव्या जोमानं घराघरात पक्ष पोचविण्यासाठी काम करा. उद्याचा सरपंच पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा असेल हे ध्येय ठेवून काम करूया असे आवाहन केले महाडिक यांनी केले.