चालक गंभीर जखमी
प्रतिनिधी / गगनबावडा
कोल्हापूरहून गगनबावडा मार्गे कोकणात मैदा पोती भरून निघालेला ट्रक रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गगनबावडापासून चार किलोमीटर अंतरावर करूळ घाटात एका वळणावर सुमारे तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक श्रीमंत शशिकांत बिकट वय 50 रा. कोल्हापूर हा गंभीर जखमी झाला आहे. तर क्लीनर धनराज श्रीमंत राऊत वय 28 रा.कोल्हापूर हा किरकोळ जखमी झाला आहे. यातील ट्रकचालक दरीमध्ये शंभर ते दीडशे फूट अंतरावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे
अपघाताची माहिती गगनबावडा येथे बसस्थानक चौकात समजताच पोलीस कॉन्स्टेबल हिंदुराव पाटील, होमगार्ड नागेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजू गवळी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख संजय पोतदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व दोरीच्या सहाय्याने नागेश कांबळे सुरेंद्र पारगावकर हिंदुराव पाटील, राजू गवळी व वैभववाडीचे काही पोलिस यांनी दरीत उतरून सुमारे दोनशे ते दीडशे फूट अंतरावर पडलेल्या चालकाला गंभीर अवस्थेत दोरीच्या सहाय्याने वरती काढले त्यानंतर त्यांना तातडीने कोल्हापूरला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीतील मैदा दरीत सर्वत्र पसरलेला आहे. या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस स्थानकात झाली आहे.