शिवसेनेचे कागल येथे आंदोलन
प्रतिनिधी / कागल
बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे नामफलक व गाडीला कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने काळे फासण्याचा प्रयत्न केला आहे. या निषेधार्थ कर्नाटक पासिंग असणाऱ्या वाहनांना महाराष्ट्रात येणेसाठी परवाने देऊ नयेत, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच यावेळी महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या काही वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ असे फलक देखील लावण्यात आले. महामार्गावर येथील सीमा तपासणी नाक्यावर हे आंदोलन करण्यात आले.
बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज उभा केला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्यावतीने जनआंदोलन सुरु आहे. मराठी भाषिकांचा स्वाभिमान डिवचण्यासाठी बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे नामफलक व गाडीला कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने काळे फासण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे या कृत्याच्या विरोधात जनआंदोलन सुरु केले आहे. कर्नाटक परिवहनच्या एसटी बसेस महाराष्ट्रात फिरवणे शिवसेनेने काल बंद केले आहे. आज कर्नाटक पासिंग असणाऱ्या वाहनांना महाराष्ट्रात येणेसाठी परवाने देऊ नयेत अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश सरनाईक, प्रशांत इंगवले यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार, अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, विद्या शिरी कांचन माने, दिपाली घोरपडे, मनजित माने, संदीप पाटील, वैभव जाधव, उत्तम पाटील, वैभव आडके आदी उपस्थित होते.