प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्याच महिन्यात कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तटबंदीवरुन टेनिस बॉल चेंडुतुन गांजा फेकल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला असतानाच, आता पुन्हा एकदा तीन पुंडक्यातुन चक्क मोबाईल, गांजा थेट कारागृहात फेकल्याचा प्रकार समोर आल्याने, कळंबा कारागृहाची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दहा मोबाईल, दोन पेनड्राईव, ५ चार्जर कॉर्ड तसेच ७७५ ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ यामध्ये आढळून आला असून, एका चार चाकी वाहनातून आलेल्या दोघा अज्ञातांनी हे साहित्य कारागृहात फेकल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधात आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास गारगोटी रोडच्या बाजुकडील कारागृहाच्या संरक्षक तट क्र.१ वरुन तीन पुडे कोणीतरी बाहेरुन आत फेकल्याचे समोर आले. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे पाहणी केली असता, चारचाकी वाहनातुन आलेल्या दोन तरुणांनी हे साहित्य कारागृहात फेकल्याचे दिसुन आले. त्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यात यश आले नाही. त्यामुळे आज त्या दोन अज्ञातांविरोधात अंमली पदार्थ कलमांतर्गत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कारागृह रक्षक रवींद्र वसंत भाट (५१,रा. मुळगाव चांदेकर वाडी, ता. राधानगरी, सध्या रा.खोली क्रं.१/४,कळंबा जेल क्वॉटर्स, कळंबा, ता.करवीर) यांनी फिर्याद दाखल केली.