जिल्हा कुंभार समाज कृती समिती अध्यक्ष मारुतराव कातवरे
गेल्या गणेशोत्सवात सोसाव्या लागलेल्या नुकसानीची भरपाई मागणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्लास्टर ऑप पॅरिस गणेशमूर्तीवरील बंदी झुगारुन देण्यासाठी डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी दिवाळीनंतर जिल्हा कुंभार समाज कृती समिती व संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाच्यावतीने तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. मोर्चांमध्ये सहकुटुंब-सहपरिवार सहभागी होण्याचे आवाहनही बैठकांमध्ये केले जाणार आहे, असे कुंभार समाज कृती समितीचे अध्यक्ष माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी सांगितले.
बापट पॅम्पमधील शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. लादल्या जात असलेल्या नियमअटींमुळे कुंभार बांधव आर्थिक संकटात सापडत आहेत, असेही कातवरे यांनी सांगितले. प्राचार्य प्रकाश कुंभार म्हणाले, प्लास्टर हासुद्धा मातीचाच एक प्रकार आहे. त्यामुळे शासनाला पाणी प्रदुषणाच्या नावाखाली प्लास्टरपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीवर बंदी आणता येणार नाही.
संत गोरा कुंभार मूर्तीकार संघाचे अध्यक्ष संभाजी माजगावकर म्हणाले, काळात ओघात कुंभार बांधवाचा खापरी व विटा तयार करण्याचे व्यवसाय कमी-कमी होत चालले आहे. अशाच शासनाने प्लास्टर ऑप पॅरीसच्या गणेशमूर्तीवर बंदी घालून कुंभार बांधवांसमोर अनेक अडचणी उभा केल्या आहेत. गेल्या गणेशोत्सवात तर गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणल्याने मूर्तीकारांच्या उंच मूर्तींचे अनेक मंडळांना वितरण झाले नाही. त्यामुळे मूर्तीकारांना सोसाव्या लागलेल्या नुकसानीची जबाबदारी आता शासनानेच स्वीकारुन भरपाई देण्याची तयारी ठेवावी.
प्राचार्य राजेंद्र कुंभार म्हणाले, फक्त कोल्हापूर जिह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुंभार बांधवांनी एकत्र येऊन मूर्तीकाम व्यवसायावर शासनाकडून केल्या जाणाऱया अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे. कुंभार समितीचे युवा अध्यक्ष उत्तम कुंभार यांचेही भाषण झाले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष बबन वडणगेकर, उत्तम कुंभार, संघटक सतिश बाचणकर, मूर्तीकार संघाचे उपाध्यक्ष अनिल निगवेकर, प्रा. निवास कुंभार, अवधुत निगवेकर, शिवाजी वडणगेकर, विजय पुरेकर, एकनाथ कुंभार, शंकर कुंभार, आर. जी. कुंभार, अशोक कुंभार, रघुनाथ कुंभार व कृष्णात कुंभार आदी उपस्थित होते.