प्रतिनिधी / वाकरे
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सोयीसाठी कुंभी कासारी कारखाना आणि कुंभी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कुडीत्रे येथे कोविड सेंटर सुरू केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
सध्या राज्याबरोबरच जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे दवाखान्यात कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत आहे. तसेच शहरात जाणे – येणे लॉकडाउनमुळे अडचणीचे होत आहे. या परिस्थितीत जनतेच्या मदतीला धावून जाणे हे माजी आमदार नरके यांनी आद्य कर्तव्य मानले आहे.यापूर्वी चिखली, आंबेवाडी, वडणगे येथील जनतेला महापुरात माजी आमदार नरके यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.कोरोनाच्या परिस्थितीत जनतेला मदत करण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत.
सध्या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आणि कुंभी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून १२० बेडचे कोविड सेंटर सुरू झाले आहे. यामध्ये २० ऑक्सिजन बेड, ५० पुरुष आणि ५० महिला रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध केली आहे.यामुळे भागातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कुडीत्रे येथे कोविड सेंटर सुरू केलेबद्दल माजी आमदार नरके यांचे कोविड रुग्ण आभार मानत आहेत.