प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड शहरात आज एका माजी नगरसेवकासह पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 4 वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेही आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
कुरूंदवाड शहरातील रुग्ण आढळलेला माळभाग मोमिन गल्ली परिसर पालिका प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे तर नृसिंहवाडी येथे ही रुग्ण आढळलेल्या गावभागातील गल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने सील करण्यात आली असून संबंधित रुग्णांच्या घरातील नातेवाईकांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे त्यांचे स्वॅब तपासण्यासाठी नेण्यात आले आहेत. सर्व परिसर ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.
दरम्यान, कुरुंदवाड शहरात रुग्णसंख्या रोजच्या रोज वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पालिका प्रशासनाने सर्व परिसर सील करून तेथे औषध फवारणी केली आहे.
दरम्यान, कुरुंदवाड शहरात टाळेबंदी उठल्यापासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत सर्व दुकाने भाजी मंडइ सुरू आहे. सात दिवसाच्या टाळेबंदीनंतर एकदमच सर्वत्र गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून पालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.