संदीप मागाडेच्या खून प्रकरणी केली अटक
प्रतिनिधी / इचलकरंजी
कबनूर (ता.हातकणंगले) येथील संदीप मागाडे यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला केके गँगचा प्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळेसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी सोमवारी व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने या तिघा संशयीत आरोपींना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गँग प्रमुख कुमार कांबळे, त्याचे साथिदार संकेत उर्फ अनिकेत अनिल शिंदे, राकेश उर्फ आकाश अनिल शिंदे ( तिघे रा. सिद्धार्थनगर, कबनूर) या तिघांना सोमवारी दुपारी पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. ही माहिती मृत मागाडेच्या नातेवाईकासह मित्र मंडळींना समजली. त्यांनी संशयीत आरोपीच्या निर्दशने करण्यासाठी मोठ्या संख्येने न्यायालया बाहेर हजर झाली होती. यांची माहिती समजताच पोलिसांनी समयसुचिकता दाखवून या तिघा संशयीताना व्हिसी द्वारे न्यायालयात हजर केले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. मागाडे खून प्रकरणी आतापर्यत अकरा संशयीत आरोपीना अटक केली आहे. यापैकी आठ संशयीत आरोपीना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, या खून प्रकरणी अद्यापी तिघे जण पसार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.