प्रतिनिधी / वारणानगर
दारूच्या व्यसनात कामधंदा न करता सतत पत्नीशी वाद घालणाऱ्या पतीने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी डंबेल्सने डोक्यात व तोंडावर हल्ला करून गंभीर जखमी केले असून पती दिपक रंगराव मोरे रा. गंगातारा कॉलनी, शेटेमाळ, कोडोली ता. पन्हाळा यास कोडोली पोलीसानी अटक केली आहे.
जखमी सविता दिपक मोरे वय ३९ हिच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी सविताचा भाऊ सुधाकर शिवाजी चव्हाण रा.निमणी नेहरुनगर ता.तासगाव , जि.सांगली याने कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे गुरुवार दि. १२ रोजी रात्री उशीरा घडलेल्या घटनेची नोंद दि. १३ रोजी झाली आहे.
आरोपी दिपक मोरे याने राहत्या घरी गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास लोखंडी डंबेल्सने पूर्वीच्या किरकोळ कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आहे. दिपक यास दारुचे व्यसन असून तो काहीएक कामधंदा करीत नाही. जखमी सविता व दिपक याची आई यांचेशी मला पैसे पाहीजेत, मी तुमच्यासाठी भरपुर केले आहे, आता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणुन मला तुम्ही किंमत देत नाहीसा, मला दुकानातसुध्दा येऊ देत नाहीसा असे म्हणुन व इतर काहीही कारणावरुन घरात वाद घालत असतो. याच वादाच्या कारणावरून दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री सविता तिच्या खोलीत झोपली असताना दिपकने तिला शिवीगाळ केली, त्यावेळी जखमी सविता मला शिव्या देवू नका असे म्हणत असताना दिपकने सवितास लाथाबुक्यांनी मारहाण करून तुला आता ठेवत नाही असे म्हणुन लोखंडी डंबेल्सने तोंडावर, डोक्यात मारहाण केली त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सपोनि दिनेश काशिद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.