वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील अंबाबाई मंदिर मागील गायरानातील अज्ञात व्यक्तीनी उभा केलेली सहा अतिक्रमणे हटवण्याची कारवाई कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेन्द्र तळपे यांनी तातडीने केली. ग्रामपंचायतीच्या या कारवाईने कोडोली ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. अंबाबाई मंदिराच्या मागील बाजूस ग्रामपंचायतीच्या गायरानामध्ये अज्ञात सहा लोकांनी ग्रामपंचायतीची रितसर परवानगी न घेता चार दिवसापुर्वी राहण्यासाठी सहा शेड उभा केले होते.
या अतिक्रमणाबाबत कोडोली गावातील जागरुक लोकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. परंतू दोनच दिवसापुर्वी ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून पदभार स्विकारलेले तळपे, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी कोडोली पोलिसाच्या उपस्थितीत गायरानातील केलेले बेकायदेशीर सहा शेडचे अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमणे कोणी केली व कोणाच्या परवानगीने केली. याची महिती प्रशाशकाने घ्यावी अशी मागणी कोडोली गावातील नागरिकांतून होत आहे.