मराठा समाजाचा निर्धार
कोरोचीत मराठा समाजाच्यावतीने रस्ता रोको
वार्ताहर / कबनूर
कोरोची येथे सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली या विरोधात घोषणाबाजी करत एसटी स्टँडवरती रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको मागे घेतल्यानंतर पूर्ववत वाहतूक सुरळीत झाली. येत्या 23 तारखेला कोल्हापूर येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेत जो निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी ठाम पणे उभे राहून पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम निर्धार केला.
कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून इचलकरंजी- हातकणंगले मेन रोडवरील कोरोची एस.टी. स्टँडवरील रस्त्यावर सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला.
ज्येष्ठ नेते माजी सरपंच डी बी पिष्टे त्यांनी सुरू असलेल्या शैक्षणिक प्रवेशाबाबत आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मराठा मुला-मुलींचे शैक्षणिक शुल्क भरावे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी त्वरित पावले उचलावीत, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत्या त्या एस.ई.बी.सी. प्रमाणेच व्हाव्यात, केंद्र सरकार व राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात सात दिवसात निर्णयक पावले न उचलल्यास मराठा समाजाच्या वतीने देशभर मराठा समाजाचा जनसमुदाय उसळून होणाऱ्या परिणामास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात अनेक वेळा हस्तक्षेप करून अध्यादेश काढलेले आहेत तेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात अन्तिम स्थगिती उठवण्यात केंद्र सरकारने पावले उचलावीत. सारथी संस्थेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात यावी, आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख अनुदान यासंबंधीचा एक कालावधी निश्चित करावा व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
याच पद्धतीने प्राध्यापक रवींद्र पडवळे व रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सकल मराठा समाजाच्या वतीने शहापूर पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांना निवेदन देण्यात आले तसेच शासनाच्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सर्व मराठा समाज बांधवांनी तोंडाला मास्क लावून रास्ता रोकोमध्ये सामील झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहापूर पोलीस स्टेशनने पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
या रस्ता रोकोमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी सरपंच सुहास पाटील डी. बी. पीस्टे, रमेश पाटील, रवींद्र पडवळे, दत्तात्रय देसाई, सचिन पवळे, सतीश सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, हनुमंत पाटील, संभाजी पाटील, महेश कळाले, बाबासो चव्हाण, रणजित शिंदे, धनाजी शेवाळे, सागर पाटील, बाळासो चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रकाश साळुंके, महादेव कावळे, सतीश टिकले, सनी ओहुळकर, पोलीस पाटील मारुती हेगडे, यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
या मार्गावर सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन सुरू होते. या मुख्य रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले होते. पोलीस विभागाने निवेदन स्वीकारल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. तद्नंतर या मार्गावरील पूर्ववत वाहतूक सुरळीत झाली.