इचलकरंजी नगरपालिकेची अनास्था, जीवनमुक्ती संघटना झिजवत आहे पायऱ्या
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
गतवर्षी संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. कोरोनामुळे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठीही कोण पुढे येण्यास प्रत्येकजण घाबरत होते. या अशा कठीण काळात इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेने पुढे येत विविध जाती-धर्मांच्या १७० कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्काराचे काम करीत असताना संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता होती. याची दखल घेवून नगरपालिकेने अंत्यसंस्कार करतेवेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे साहित्य खरेदी करण्याविषयी प्रती मृतदेह पाच हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेतला. परंतु सुमारे १ लाखांचे सानुग्रह अनुदान नगरपालिकेने संस्थेला दिलेलेच नाही. याच अनुदानासाठी संस्थेचे संस्थापक अनिल घोडके गेले सहा महिने नगरपालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत.
जीवनमुक्ती संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता होती असे असतानाही त्यांनी हे काम केले परंतु त्याच्या या कामाकडे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह पालिका पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे संस्थापक अनिल घोडके यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची आकडेवारी शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही ४ हजार १२० झाली आहे तर कोरोनामुक्त संख्या ३ हजार ८७१ इतकी आहे. सध्या शहरातील ५४ व्यक्ती उपचारात आहेत. तर १९५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. |