प्रतिनिधी / शिरोळ
गेल्या दीड पावणे दोन वर्षापासून देशात राज्यात कोरोनाने थैमान मांडले असतानादेखील जिल्हा परिषदेच्या शाळांनी एक आदर्श निर्माण केला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीही अवलंबून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम केले आहे. या शाळेच्या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर क्रमांक तीन या विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय बाबासाहेब भाऊसाहेब लडगे या प्रवेशद्वाराचे उद्घाटन ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.
उद्योगपती प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पाच लाख 50 हजार रुपये खर्चून भव्य असे स्वागत कमान बांधून दिले आहेत. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.