कोविड सेंटरमधून जोपासली सामाजिक बांधिलकी
कोरोनाग्रस्त रुग्णांवर केवळ उपचार न करता त्यांच्याशी संवाद साधून मानसिक आधार देण्याचे काम
संताजी घोरपडे व टीमकडून केले जातेय.
प्रवीण देसाई / कोल्हापूर
सध्या कोरोनाच्या धसक्याने अत्यंत जवळची माणसही लांब जात आहेत. अशा परिस्थितीत सायबर कॉलेज येथील बॉईज हॉस्टेलमध्ये उभारण्यात आलेल्या व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या कोविड सेंटरमधून रुग्णांना मानसिक आधार दिला जात आहेत. डॉक्टरांसह सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या तरुणांची फौजच रुग्णांसाठी अहोरात्र झटत आहे. येथे उपचार घेणारे व बरे होऊन गेलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील समाधानच या तरुणांना नवी ऊर्जा मिळवून देत आहे.
कोरोनाने अत्यंत जवळची माणसं दूर केली; पण ना नात्याची ना गोत्याची माणसं मात्र कधी नव्हे ती अगदी जवळ आणली. हे आशादायक चित्र कोल्हापुरातील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या कोविड केअर सेंटरमध्ये पहायला मिळत आहे. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्यासह त्यांची टीम व मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर यांच्यासह त्यांचा वैद्यकिय स्टाफ रुग्णांची सुश्रुषा करत आहेत.
समाजिक बांधिलकी
ज्या आजाराच्या नुसत्या नावानेच जीवापाड प्रेम करण्याच्या गप्पा मारणारे नातेवाईक व मित्र मंडळी अंतर ठेवत आहेत. अशा परिस्थितीत व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट्रचे कार्यकर्ते मात्र जीवावर उदार होऊन पॉझिटिव्ह रुग्णांना चहा, दूध, अंडी, नाष्टा, सकस अन्न व इतर सुविधा अहोरात्र पुरवत आहेत. विशेष म्हणजे यांना कोणतेही विमा कवच नाही. तरीही ते सामाजिक बांधिलकी जोपासत मोठ धैर्याने काम करत आहेत.
केअर सेंटरमध्ये नवीन रुग्ण आला की तो दडपणाखाली असल्याने जुने रुग्ण त्याला धीर देऊन प्रथम त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करतात. सकारात्मक विचारांमुळेच बरेच रुग्ण कोरोनामुक्त होत असल्यामुळे केंद्रात दिवसभर भक्तीगीते लावली जातात.दररोज दुपारी फुफ्फुसाचा व्यायाम घेतला जातो.
कोल्हापूरकरांचे दातृत्व कोरोना संकटातही कायम
केअर सेंटरमध्ये काम करताना एक वेगळचं समाधान मिळते.गंभीर पेशंट आजारातून बाहेर आल्यावर त्याच्या आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहऱयावरील आनंद खूपचं समाधान देऊन जातो. त्यामुळे सेंटरमध्ये मध्यरात्रीपर्यंत जरी काम केले तरी थकवा जाणवत नाही.
-संताजी घोरपडे, अध्यक्ष, व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट्र, कोल्हापूर
या कठीण प्रसंगाच्या निमित्ताने सायबर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये उभारण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटर मध्ये प्रकर्षाने जाणवलेल्या आपुलकी व टिम स्पिरीट अनुभवायला मिळाले. याचे खरे श्रेय हे विनम्र स्वभाव, उत्तम संवाद कौशल्य असलेल्या डॉ.संगीता निबांळकर व सामाजिक भान जपणाऱया संताजी घोरपडे यांना जाते.
–एकपॉझिटिव्हरुग्ण, सायबरबॉईजहॉस्टेलकोविडसेंटर