हंगाम सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे केएसएला संकेत, छत्रपती शाहू स्टेडियम सामन्यांसाठी सुसज्ज
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे यंदा छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल हंगाम होणार की नाही याबाबत आजही फुटबॉलप्रेमीत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. अनेकांनी तर हंगामाचा विषयच डोक्यातून काढून टाकला आहे. अशी परिस्थिती असतानाच अगदी अलिकडेच केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्याशी झालेल्या चर्चेत मार्च महिन्यापासून फुटबॉल हंगाम करण्याचे संकेत देत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फुटबॉलप्रेमींना सुखद धक्का दिला आहे. केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याची तयारी केएसएने सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्देश घेऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हंगामाचा किकऑफ केला जाईल, असे केएसएने संकेत दिले आहेत.
गतहंगामात जोमात आला असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला आणि फुटबॉल हंगाम तातडीने स्थगित केला. यावेळी सुरु असलेली महापौर चषक फुटबॉल स्पर्धा निम्म्यातच बंद पडली. याचा फटका संघ बांधणीसाठी स्थानिकपासून आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर लाखो रूपये मोजलेल्या फुटबॉल संघांना बसला. गतहंगामाचा कालावधी संपून ७ महिने उलटून यंदाचा डिसेंबर महिना आला तरी कोरोनाच्या भीतीमुळे फुटबॉल हंगाम सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने तयारी दर्शवली नाही. सुदैवाने ऑक्टोबरपासून कोरोनाचे प्रमाण कमी कमी होऊ लागले होते. असे असले तरीही फुटबॉल सामने पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीत कोरोना बाधित आला तर त्याचा परिणाम अन्य फुटबॉलप्रेमींना भोगावा लागू नये, अशी फुटबॉल हंगाम सुरू करण्यास परवानगी न देण्यामागची शासनाची भूमिका होती.
दुसरीकडे फुटबॉल हंगाम सुरु करा, अशी मागणी फुटबॉल संघ आणि फुटबॉलप्रेमींकडून जोर धरू लागली होती. फुटबॉलप्रेमींच्या मागणीचा आदर करत केएसएने गेल्या जानेवारी महिन्यात संघ नोंदणी करून घेण्याची हालचाली सुरु केल्या. फुटबॉल संघांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकच बोलावून त्यांना संघ नोंदणीची माहिती दिली मात्र हंगाम सुरु होईल, हे मात्र सांगितले नाही. फुटबॉल संघांनीही फारसे मनावर न घेता यंदा हंगाम होणार नाही, अशी समजूत करून घेतली.
मात्र अलीकडेच फुटबॉल स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी स्वतःहून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा करून फुटबॉल हंगामास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ही विनंती आणि लोकभावना लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही पुढील मार्च महिन्यापासून हंगाम सुरु करण्याबाबतचे संकेत मालोजीराजे यांना दिले आहेत. केएसएनेही मार्च महिन्यात केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. फुटबॉल संघ नोंदणीचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. त्यामुळे आता गेली ११ महिने मैदानातील सरावापासून लांब राहिलेल्या वरिष्ठ फुटबॉल संघांना सरावात झोकून द्यावे लागणार आहे.
शाहू स्टेडियम सुसज्ज कोरोनाच्या घटत चाललेल्या प्रमाणामुळे आज ना उद्या फुटबॉल हंगाम सुरु करण्याला प्रशासनाची परवानगी मिळेल, असे गृहित धरून केएसएने छत्रपती शाहू स्टेडियमवरील हिरवळ सामन्यांसाठी तयार ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभीमूवर प्रशासनाकडून सामने आयोजित करण्याबाबत जे निर्देश मिळतील ते संघांपर्यंत पोहचवून त्यादृष्टीने तयारी करण्याचे आवाहन केले जाईल, असे केएसएच्या सुत्रांनी सांगितले. |