कोरोना नव्या रूग्णांची संख्या 100 च्या आत, सहा महिन्यांत डेंग्यू रूग्णांवर कोरोनाचे उपचार,
डेंग्यू, चिकनगुणिया लक्षणांमुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह, शहर परिसरासह जिल्ह्यात साथरूग्णांमध्ये वाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना साथीमुळे नॉन कोरोना रूग्णांकडे दुर्लक्ष झाले, अगदी डेंग्यू, चिकनगुणिया, जलजन्य साथ रूग्ण असतानाही काहींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर कोरोनाचे उपचार झाले. सध्या कोरोना रूग्ण संख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. याचवेळी डेंग्यू, चिकनगुणियांसह जलजन्य साथ रूग्णांची संख्या वाढत आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये अशा रूग्णांची गर्दी वाढत आहे. शहरातील आरोग्य विभागाच्या सर्व्हेतून ही बाब पुढे येत आहे.
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोना साथ नियंत्रणासाठी सीपीआरसह 16 डिस्ट्रिक्ट केअर हॉस्पिटल, 45 कोरोना हेल्थ सेंटर, 63 केअर सेंटर अशा 124 सेंटरद्वारे सात हजारांपर्यत बेडची उभारणी केली. `जीवनदायी’तील हॉस्पिटल्ससह काही खासगी हॉस्पिटल्सद्वारे केअर सेंटर सुरू झाली. कोरोनाची धास्ती अन् लॉकडाऊनमुळे नॉन कोरोना रूग्णांची कोंडी झाली. काहींना टेलिमेडीसीनचा आधार मिळाला. दरम्यान 6 महिन्यांत 2 लाखांहून अधिक टेस्ट झाल्या. त्यातून 47 हजारांपर्यत पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. सध्या कोरोना सक्रीय रूग्णसंख्या 11 हजारांवरून 4 हजारापर्यत खाली आली आहे. संशयित, नव्या रूग्णांची संख्या 15 टक्क्यांपर्यत खाली आली आहे. याचवेळी चिकनगुणीया, डेंग्यू रूग्ण वाढत आहेत.
कोरोना काळात जिल्हा हिवताप कार्यालयाशी निगडीत 50 हून अधिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वॅब तपासणीत अडकले. त्यातून डेंग्यू, चिकनगुणिया रूग्णांच्या तपासणीकडे दुर्लक्ष झाले. ताप, अंगदुखीची लक्षणे कोरोनातही असल्याने निदान होईपर्यत, स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यत अशा संशयित रूग्णांवर कोरोनाचेच उपचार झाले. त्यामुळे मे ते जुलै या 3 महिन्यांत डेंग्यू, चिकनगुणियाचे रूग्ण अपवादात्मकच दिसले, पण रेकॉर्डवर मात्र ते कोरोनामुळे दिसून आलेले नाहीत.
महापालिका क्षेत्रात 9 महिन्यांत डेंग्यूचे 262 तर चिकनगुणीयाचे 95 रूग्ण दिसून आले. त्यातही ऑगस्टमध्ये 26 तर सप्टेंबरमध्ये 25 डेंग्यू रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूचे 159 तर चिकनगुणीयाचे 97 रूग्ण नोंद आहेत. त्यातही जून ते ऑगस्टपर्यत कोरोना साथीमुळे या रूग्णांची नोंद निरंक आहे. जुलैमध्ये फक्त 12 चिकनगुणीया रूग्णांची नोंद आहे. हे सारे चित्र पाहता साथीच्या लक्षणातील साम्यांमुळे चिकनगुणीया, डेंग्यूच्या रूग्णांवर प्रारंभी कोरोनाचेच उपचार झाल्याचे समोर आले आहे. अगदी हिवताप कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला डेंग्यू झाला असतानाही प्रारंभी कोरोनाचे उपचार घ्यावे लागले. अशा रूग्णांची संख्या अधिक आहे.
ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आहे. पण या 15 दिवसांत ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत कोरोना रूग्ण शोध मोहीम सुरू आहे. या मोहिमेत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना संशयित डेंग्यू, चिकनगुणीया रूग्णाचीच माहिती अधिक मिळत आहे. त्यामुळे कोरोनाला ब्रेक मिळत असताना चिकनगुणीया आणि डेंग्यूसह टॉयफाईडसारख्या जलजन्य साथरूग्णांची संख्या वाढत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.