अर्पित जोशीच्या साज या लघुपटाची निवड
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरी साज हे सुवर्ण अलंकाराचे वैभव तर आहेच, पण आता कोल्हापुरी साज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही लखलखणारा आहे. जयपूर येथे होणाऱया जयपूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी (जीफ) `साज, कोल्हापूरचे सुवर्ण वैभव’ या लघुपटाची निवड झाली आहे. 15 ते 19 जानेवारीपर्यंत चालणाऱया या महोत्सवासाठी 80 देशातून पंधराशे प्रवेशिका आल्या होत्या. यातील निवड झालेल्या 161 लघुपटांच्या पहिल्या यादीत कोल्हापुरी साजाचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरी साजाचे वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचणार आहे. कोल्हापूरच्या सुवर्ण कारागीर परंपरेचा हा मोठा गौरव आहे. कोल्हापुरातील अर्पित जोशी या तरुणाने हा लघुपट तयार केला आहे.
कोल्हापुरी साज हा कोल्हापूरच्या सराफ बाजारात घडणारा एक अनोखा अलंकार आहे. तो हस्तकारागिरीचा एक अलौकिक नमुना आहे. आजकाल खूप फॅन्सी दागिन्यांची रेलचेल आहे. त्याची उलाढालही मोठी आहे. पण, अशा वातावरणातही कोल्हापुरी साज आणि त्याचा लखलखीतपणा आपला वेगळा बाज राखून आहे. आजही कोल्हापुरी साजाला मोठी मागणी आहे. आणि आपल्या सुवर्ण अलंकाराच्या पेटीत कोल्हापुरी साज असणे ही भगिणींच्यादृष्टीने वेगळेच समाधान देणारी बाब आहे. कोल्हापुरी साजाला नुसते देखणेपण नाही तर त्याच्या बांधणीला एक ठराविक परंपरेची जोड आहे आणि सुवर्ण कारागिरांनी बदलत्या काळातही तो जुनाच बाज जपून कोल्हापूरच्या सुवर्ण परंपरेचा ठेवा पिढÎानपिढÎा जपला आहे. नेमके हे वेगळेपण अर्पित जोशी या तरुणाने या लघुपटात टिपले आहे. त्याला मिलिंद उटगीकर, माधवी संजय देशपांडे, प्रसन्न निगडे, संजय देशपांडे, शशांक घाटगे यांची साथ लाभली आहे.