प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील आक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील औषधनिर्माणशास्त्र, विधी, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, वास्तुनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी या अभ्याक्रमाच्या क्लस्टर पध्दतीच्या परीक्षा 22 मार्चपासून सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 6 ते 12 एप्रिल या कालावधीतील परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. या कालावधीतील सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 एप्रिलपासून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात घ्या, अशा सूचना परिपत्रकाव्दारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी क्लस्टर महाविद्यालयांना दिल्या आहेत.
क्लस्टर महाविद्यालयांतर्गत सर्व व्यवसायिक विषयांच्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक क्लस्टर महाविद्यालयांनी नव्याने जाहीर करावे. सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 12 एप्रिल या कालावधीतील विषयांची ऑनलाईन परीक्षा घ्यावी. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी क्लस्टर महाविद्यालयाने घ्यावी. संपूर्ण राज्यभर शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरी या दोन दिवसात एकाही विषयाचा पेपर घेवू नये, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक पळसे यांनी केले आहे.