चार पाच महिन्यांपासून व्हायरल आजाराच्या रूग्णांवर उपचार : कोरोनाच्या काळात हायरिस्कमध्ये अवितरण सेवा
संजीव खाडे / कोल्हापूर
कोरोना दररोज वाढणारा संसर्ग, रूग्णांची वाढती संख्या यामुळे शहरातील सर्व हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाली आहेत. इतर आजारांच्या अर्थात नॉन कोविड रूग्णांना हॉस्टिपमध्ये उपचार आणि बेड मिळत नाहीत. अशा स्थितीत गेली चार पाच महिने शहरासह जिल्हय़ातील छोटे दवाखाने, क्लिनिकमध्ये प्रॅक्टीस करणारे डॉक्टर नॉनकोविड रूग्णांसाठी तारणहार ठरले आहेत. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि एमडी असणार्या डॉक्टर्संनी आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून व्हायरल आजाराच्या हजारो रूग्णांवर उपचार केले आहेत. सध्या हॉस्पिटल फुल्ल असताना क्लिनिकच्या माध्यमातून सुरू असलेली वैद्यकीय सेवा रूग्णांसाठी आधार ठरत आहे.
शहरासह जिल्हय़ात शेकडो क्लिनिक आहेत. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि एमडी असणारे डॉक्टर या क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहेत. सर्वसाधारणपणे सर्दी, खोकला, थंडी, ताप, डेंग्यू, मलेरिया, मधुमेह, युरिन इन्फेक्शन आदींच्या रूणांवर या ठिकाणी उपचार होतात. कोरोनाची सुरूवात झाली. तेंव्हा प्रारंभीच्या काळात कोरोनाच्या रूग्णांची संख्या फारशी मोठी नव्हती. त्यावेळी कोरोनाच्या भीतीने अनेक सर्दी, खोकला आणि तापाचे रूग्ण क्लिनिकमध्ये येणे टाळत होते. मेडिकल शॉपमधून औषध घेत हेते. मेडिकल शॉपनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देणे बंद केल्यानंतर व्हायरल आजाराचे रूग्ण क्लिनिकमध्ये उपचारासाठी येऊ लागले. क्लिनिकमधील गर्दी वाढू लागली. कोरोनाच्या काळात मार्चपासून सप्टेंबरपर्यंत उन्हाळा अनुभवल्यानंतर पावसाळा आला. त्यामुळे व्हायरल आणि पावसाळय़ात होणारे आजाराचे रूग्णही वाढले. त्यांच्यावर उपचार करण्याचे काम क्लिनिकमधील डॉक्टर्स करत आहेत. येणार्या रूग्णांमध्ये काही कोरोना संशयित रूग्णही असतात. अशा हायरिक्समध्ये सध्या क्लिनिकमधील डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत.
हॉस्पिटलऐवजी क्लिनिकचा पर्याय
मधुमेह (डायबेटिस), युरिन इन्फेक्शन, ब्लडप्रेशर, हायपरटेंशनसारख्या आजारात रूग्ण मोठय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. पण सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसल्याने हे रूग्ण क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या संशयित रूग्णांवरही उपचार
सर्दी, ताप, खोकला झालेल्या रूग्णात काही कोरोना संशयित रूग्ण असतात. काहींच्या कोरोनाची लक्षणे असतात पण त्रास होत नसतो. अशा रूग्णांवरही क्लिनिकमधील डॉक्टर आरोग्य प्रशासनाच्या निर्देनुसार उपचार करत आहेत.
वैद्यकीय सेवा, उपचार, मानसिक आधार
सध्या कोणताही आजार झाला की रूग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जात आहेत. अशा स्थिती येणार्या रूग्णांना वैद्यकीय सेवा, उपचार आणि मानसिक आधार देण्याचे काम क्लिनिकमधील डॉक्टर करत आहेत. हॉस्पिटलच्या तुलनेत क्लिनिकमध्ये कमी पैशात उपचार होतात. दररोज विविध आजाराचे 70 ते 80 रूग्ण येतात. त्यात नवीन आणि फॉलोअपचे रूग्ण असतात. सर्वांवर उपचार केले जातात. कोरोना संशयित रूग्ण असेल तर त्याची कल्पना आरोग्य प्रशासनाला दिली जाते. गेली चार पाच महिने अवितरण वैद्यकीय सेवा सुरू आहे.
-डॉ. हितेश गांधी, अरिहंत मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, गुजरी कॉर्नर, आझाद गल्ली
मध्यंतरीच्या काळात व्हायरल आजाराच्या रूग्णांबरोबर डेंग्यूचे रूग्ण वाढले होते. आता त्यांची संख्या घटली आहे. मात्र येणार्या रूग्णांत कोरोना संशयित दोन तीन रूग्ण असतात. कोविड आणि नॉन कोविड रूग्णांवर उपचार केले जातात. त्यांना औषध, आहार, विश्रांतीविषयक सल्ला दिला जातो.
-डॉ. तन्वी पाटील, गायत्री क्लिनिक, ब्रह्मेश्वर बाग, शिवाजी पेठ