निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
पेट्रोल-डिझेलसह शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराणा प्रताप चौक येथे तीव्र निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले. खतांची दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौक येथे खत दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.
निवेदनामध्ये म्हटले आहे, केंद्र सरकारने इंधन दरवाढीबरोबरच रासायनिक खतांच्या दरात वाढ करून सर्वसामान्य जनता आणि शेतकऱयांना मोठा धक्का दिला आहे. 10:26:26: या खताची किंमत 600 रूपये तर डीएपी खतांची किंमत 715 रूपयांनी वाढवली आहे. जे डिएपी खत 1185 रूपयांना मिळत होते, ते आता 1900 रूपयांना मिळणार आहे. 10:26:26 च्या 50 किलोच्या गोणीला 1175 एंवजी 1775 रूपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय पोटॅशच्या किंमतीमध्येही वाढ केली आहे.
खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. केंद्रसरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी अगोदरच अडचणीत असताना आता खतांचे दर स्थिर ठेवण्याबरोबरच ते काहीअंशी कमी करणे अपेक्षीत होते. तरीही दरवाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही दरवाढ तत्काळ रद्द न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, अनिल साळोखे, सुनील देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.