फुलेवाडी रिंगरोड परिसरात अनोखे आंदोलन, नागरिकांकडून मनपा प्रशासनाचा निषेध
प्रतिनिधी/कोल्हापूर
फुलेवाडी रिंगरोड परिसरात नव्याने झालेल्या रिंगरोडसह जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार मनपाकडे केली होती. मात्र अद्यापही हा रस्ता अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. त्यामुळे दिपावली सणाच्या सकाळी येथील क्रांतीसिंह नाना पाटील नगर विकास कृती परिषदेच्यावतीने खड्यामध्ये अभ्यंगस्नान करुन अनोखे आंदोलन केले. यावेळी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष वेधत जोरदार घोषणाबजी करत प्रशासनाचा निषेध केला.
येथील जुन्या रिंगरोडवरुन कणेरकरनगर, लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, अरुण सरनाईक नगर, निचितेनगर येथील नागरिक ये-जा करत आहेत. मात्र रस्त्याची चाळण झाल्याने येथे वारंवार अपघात घडत आहेत. यामुळे परिसरातील अनेक नागरिक जखमी झाले आहेत, मनपा प्रशासनाकडे रस्ता डांबरीकरणाबाबत वारंवार मागणीकरुनही सोईस्कर दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मनपाचे रस्त्या डांबरीकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. आंदोलनात माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे सहभागी झाले होते.