शासकीय आरोग्य योजना सक्तीची अट केली शिथिल : जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय
संजीव खाडे / कोल्हापूर
राज्य शासनाच्या आरोग्य योजना लागू नसलेल्या खासगी हॉस्पिटलना कोरोना लसिकरण करण्यास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय हॉस्पिटलबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्ये यापुढे नागरिकांना कोरोनाची लस घेत येणार आहे. राज्यात कोरोना लसिकरण मोहीम गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने टाकलेल्या या पाऊलाचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे.
सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तरे देताना बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रभावी भाषण केले होते. त्यामध्ये कोरोनाच्या स्थिती, लसिकरण प्रक्रिया यावरही त्यांनी भाष्य केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरणे, सातत्याने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसुत्रीचा वापर सुरूच ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्याचबरोबर राज्यात कोरोना लसिकरण मोहीम गतिमान करा, जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस द्या, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने शासकीय, निमशासकीय हॉस्पिटलबरोबर खासगी हॉस्पिटलनाही कोरोना लसिकरणाच्या मोहीम सक्रिय करण्याच्या दृष्टीने तातडीने आराखडा तयार केला असून सशर्त परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सध्या शासकीय आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांत कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येते. त्याचबरोबर महात्मा फुले आरोग्य योजना, आयुषमान भारत योजना या योजना असणाऱया खासगी हॉस्पिटललाही कोरोना लस देण्याची परवानगी दिली आहे. पण नागरिकांची संख्या आणि हॉस्पिटलची संख्या यामुळे कोरोना लसिकरणावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजना लागू नाहीत तरीही ही हॉस्पिटल कोरोना लस देण्यास इच्छुक आहेत. त्यांना लसिकरण मोहिमेतील अटी, शर्तीचे पालन केल्यास परवानगी देण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल.
अशी मिळणार परवानगी
कोरोनाच्या लसिकरणासाठी हॉस्पिटलमध्ये नोंदणी रूम, लस देण्यासाठी आवश्यक रूम आणि निरीक्षण रूम अशा तीन स्वतंत्र रूम असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर कोरोना लस (कोव्हॅक्सीन) विशिष्ट तापमानात ठेवण्यासाठी कोल्डचेन पॉईंट (रेफ्रिजेशन सिस्टिम) आणि लस देणारा प्रशिक्षित मेडिकल स्टाफ अत्यावश्यक असतो. जे खासगी दवाखाने या सुविधांबाबतच्या अटी पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यांना कोरोना लस देण्याची परवानगी मिळणार आहे.
महापालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन
शासकीय आरोग्य योजना लागू नसलेल्या पण कोरोना लसिकरण मोहिमेत योगदान देऊ इच्छिणाऱया शहरातील खासगी दवाखान्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. या विभागाकडून राज्याच्या आरोग्य विभागाकडे इच्छुक खासगी दवाखान्याची यादी पाठविली जाईल. अंतिम परवानगी मात्र सर्व पडताळणीनंतर राज्याचा आरोग्य विभाग देईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिली.