गगनबावडा तालुक्याला स्वतंत्र ॲम्बुलन्स देणार,
मतदारसंघात २५ हजार मास्क व सॅनिटायझर बॉटलचे वाटप, स्व. राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
प्रतिनिधी / सांगरूळ
खुपिरे (ता.करवीर )येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्लांटसाठी पन्नास लाख रूपयांचा निधी दिला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे तसेच गगनबावड्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देणार ,असल्याचे प्रतिपादन आ. पी. एन. पाटील सडोलीकर यांनी केले.
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना आ. पाटील यांनी कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन ही काळाची गरज बनली आहे. करवीर मतदार संघातील खुपिरे या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे . त्यामुळे खुपिरे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी पन्नास लाखाचा निधी दिला आहे. तसेच यापूर्वी हसूर दुमाला व खुपिरे येथे रुग्णवाहिका दिली असून गगनबावडा तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देणार असल्याचे सांगितले. राजीव गांधींच्या दूरदृष्टीतूनच आजच्या प्रगत भारताची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यावेळी गरजूसाठी 25 हजार मास्क व 20 हजार सॅनिटायझरच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले. गतवर्षि आ. पाटील यांनी सत्तर हजार सॅनिटायझर बॉटलचे वाटप केले होते. सुरुवातीस स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन आ.पाटील व करवीर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील (सडोलीकर), जिल्हा परीषद सदस्य व राजीवजी सुतगिरणीचे अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर), करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक उदय पाटील, संजय गांधी अनुदान समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा परीषद सद्स्य सुभाष सातपुते,माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, शिवाजीराव कवठेकर यांच्यासह भोगावती साखर कारखाना, श्रीपतरावदादा बँक राजीवजी सुतगिरणी, जिल्हा परीषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.