प्रतिनिधी / गडहिंग्लज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घातले आहेत. 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी सणातील सोने लुटणे आणि पालखी मिरवणूक रद्द करण्याचा आदेश कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार दिनेश पारगे यांनी दिला आहे.
गडहिंग्लज शहरातील दसरा चौकात वर्षानुवर्षे मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोने लुटणे आणि पालखी सोहळा मिरणूक कार्यक्रम होत असतो. मोठ्या संख्येने गडहिंग्लज शहरवासियांच्या उपस्थितीत सोने लुटले जाते. पण यंदा कोरोना खबरदारीच्या पार्श्वभुमीवर कार्यक्रम आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शहरातील नंजूडेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, काळभैरव मंदिर, महादेव मंदिर, मारूती मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि पुजाऱ्यांना विशेष नोटीसीद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखी मिरवणूक सोहळा व सीमोल्लंघन कार्यक्रम रद्द केला असून घरीच राहून दसरा सण साधेपणाने साजरा करा असे आवाहन सुधीर पाटील (खातेदार) यांनी केले आहे.