प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथील विवाहिता श्वेता धनाजी वाडकर (वय 22) हिचा इस्पुर्ली येर्थींल खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला. तिची गुरूवारी प्रसुती झाली होती, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला, त्यानंतर तिची प्रकृती गंभीर बनली होती. शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे श्वेताचा मृत्Îू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, सीपीआर हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्रासमोर नातेवाईकांनी शुक्रवारी गर्दी केली. संबंधित हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली. पोलीस उपाधिक्षक आर. आर. पाटील यांनी नातेवाईकांची भेट घेतली. इस्पुर्ली पोलिसांना घटना नोंदीच्या सुचना दिल्या.
करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी येथील श्वेता पदवीधर होती. तिचा हणबरवाडी येथील धनाजी वाडकर यांच्याशी तीन वर्षांपुर्वी विवाह झाला होता. इस्पुर्ली येथील माहेर हॉस्पिटलमध्ये तिची नियमित तपासणी सुरू होती. श्वेता धनाजी वाडकर (वय 22) हिला गुरूवारी सकाळी प्रसुतीसाठी इस्पुर्लीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सायंकाळी तिची सिझेरियनद्वारे प्रसुती झाली, पण बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर बनत गेली. शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, इस्पुर्लीतील त्या हॉस्पिटलने पहाटे 108 ऍम्ब्युलन्स मागवली. यावेळी ऍम्ब्युलन्समधील चालकाने डॉक्टरांना `पेशंटचा मृत्यू झाला असताना त्यांला का पाठवून देत आहात,’ असा प्रश्न केला. यावर तुम्ही काय डॉक्टर आहात का, असा प्रश्न संबधितांनी त्याला विचारला. अखेरीस रूग्ण सीपीआरमध्ये येण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी स्पष्ट केले.
योग्य ती चौकशी करून गुन्हा नोंद करू ः उपाधिक्षक आर. आर. पाटील
सीपीआरमधील शवविच्छेदन केंद्रासमोर विवाहितेच्या नातेवाईकांनी गर्दी केली. डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळेच श्वेताचा मृत्यू झाला, असा आरोप करत इस्पुर्लीतील खासगी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करा, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची भुमिका घेतली. पोलीस उपाधिक्षक आर. आर. पाटील यांनी नातेवाईकांची भेंट घेऊन संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे.
परमोनली इंब्युरिझममुळे विवाहितेचा मृत्यू : हॉस्पिटल प्रशासनाची माहिती
माहेर हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार श्वेता वाडकर प्रसुतीसाठी गुरूवारी सकाळी दाखल झाली, नैसर्गिक प्रसुतीसाठी डॉक्टरांनी तीन वाजेपर्यत वाट पाहिली, पण गर्भाशयाचे मुख काही उघडले नाही. तिच्या वेदना वाढल्याने तिची शस्त्रक्रिया, सिझेरीयन करावे लागेल, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. त्यावर सिझेरीयनला परवानगी देण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास तिच्या रक्ताच्या टेस्ट केल्या. त्यात रक्तातील हिमोग्लोबीन 6 पर्यत खाली होते. त्यामुळे डॉक्टरांनी 2 रक्तपिशव्या लागतील, असे स्पष्ट केले. सिझेरियननंतर ऑक्सिजन कमी मिळाल्याने बाळाचा गर्भाशयातच मृत्यू झाला, याची माहिती नातेवाईकांना दिली. गर्भाशयापासून नाळ वेगळी होताना रक्तस्राव झाल्याने, नाळेतील रक्त गर्भाशयात साचल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रात्री मातेची प्रकृती चांगली होती, पण पहाटे साडेतीनच्या सुमारास तिला त्रास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला ऑक्सिजन देण्यात आला. तरीही प्रकृती गंभीर बनल्याने 108 ऍम्ब्युलन्सला बोलावून घेतले. तिला ऍम्ब्युलन्समध्ये ठेवताच तिच्या तोंडातून फेस आल्याने तेथेच तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत याला परमोनली इंब्युरिझम म्हटले जात असल्याची माहिती डॉ. केदार कुंभार यांनी दिली.