उचगांव / वार्ताहर
गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी पाचने वाढली असून ती 291 वर पोहोचली आहे. गांधीनगरमधील परिसरातील मृतांची संख्या आजअखेर आठवर पोहोचली आहे. दिवसागणिक कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण गांधीनगर परिसर चिंताग्रस्त बनला आहे.
गांधीनगर व उचगाव येथे रविवारी प्रत्येकी दोन रुग्ण वाढले आहेत. गडमुडशिंगी व वळीवडे येथील रुग्णसंख्या स्थिर आहे. दरम्यान, गडमुडशिंगीमध्ये गावभागात तीन दिवसांपूर्वी मिळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे तिथे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायतीतर्फे सुरू आहे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे डॉ. रिजवाना मुल्ला व आशा कर्मचारी घरोघरी सर्वे व जनजागृती करत आहेत. चिंचवाडमध्ये 83 वर्षांच्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव आल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची रविवार अखेरची संख्या अशी
गांधीनगर (131), वळिवडे (63), उचगाव (57), गडमुडशिंगी (24), चिंचवाड (16). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 291 वर पोहोचली आहे. गांधीनगर परिसरातील आजअखेर मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.