प्रतिनिधी/गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील २३ गावांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम गतीने सुरु आहे.कोरोणा या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्र्वभूमीवर निधीअभावी ते रखडले होते.
‘ नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न , मराठी भाषेतील या म्हणीप्रमाणे गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत घडले आहे.२००५ साली तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्वीजय खानविलकर यांच्या विशेष योगदानातून गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामिण रुग्णालय मंजूर केले.येथील प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदवडे खोरीत हलविले.२३ गावांच्या आशा पल्लवित झाल्या.पण जागेअभावी ते लालफितीत अडकले.माजीआमदार चंद्रदिप नरके यांनीही नवीन इमारती बद्दल पाठपुरावा केला होता.निधीची तरतूद असूनही जागेअभावी गेली १४ वर्षे भाडेपोटीच्या जागेत सुरु आहे.जागेअभावी निम्मा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरवी येथील कामकाज होते.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून गारीवडे फाट्याजवळ जागा उपलब्ध केली.जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते कारखाना संचालक उदय देसाई,संजयकुमार पाटील बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत २०१९ मध्ये पायापूजन समारंभ पार पडला. सुमारे साडेचार कोटी निधीची तरतूद असलेल्या या इमारतीचे बांधकाम मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यासाठी वरदलक्ष्मी कंन्स्ट्रक्शन यांच्यावतीने वेगवान गतीने काम सुरू केले. मात्र मार्च महिन्यातच कोरोणा या रोगाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली.परिणामी हे काम पून्हा रखडले.हा निधी इतरत्र वर्ग केला असला तरी गेल्या आठवड्यापासून हे काम पून्हा सुरू केले आहे.तालूक्यातील २३ गावांना यांचा लाभ होणार आहे.शेजारच्या राधानगरी तालुक्यातील पाच गावांची यामूळे सोय होणार आहे.