जिल्हाधिकार्यांचे जिल्हा परिषद, शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय हॉस्पिटल्सना निर्देश, चढय़ा दराने निविदा मान्य करून शासनाची फसवणूक करणाऱयांची चौकशी करण्याची सुचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेऊन उत्पादन मूल्य, प्रचलित बाजार भावापेक्षा जास्त दराने निविदा मान्य करुन काही पुरवठादारांनी शासनाची फसवणूक केली आहे. अशा पुरवठादारांची चौकशी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिले.
जिल्हाधिकारी देसाई यांनी गुरूवारी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मस्के यांना पत्र पाठवले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी मोठय़ा प्रमाणात लागणारे साहित्य, औषधे व उपकरणे, तपासणी किटची खरेदी केली आहे. 12 मार्चला आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठात्यांना आवश्यकतेनुसार औषधे, उपकरणांची निविदा प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती केली आहे. 27 मार्चला साहित्य, औषधे, व उपकरणे, तपासण किट खरेदीसाठी खरेदी, पुरवठा अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. खरेदीची सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या स्तरावर प्रामुख्याने पार पाडली आहे. पण ती प्रचलित शासकीय नियमाप्रमाणे व पारदर्शक पद्धतीने राबवणे बंधनकारक होते. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेस उपलब्ध करुन दिलेल्या, जिल्हा नियोजन समिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या निधीतून साहित्य, औषधे व उपकरणे खरेदी केली आहेत. त्याचा पुरवठा शासकीय कोरोना रुग्णालयांना केला आहे.
विविध संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाईचा निर्णय
कोरोना प्रतिबंधासाठीच्या साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत तक्रारी वाढल्या होत्या. यामध्ये काही पुरवठादारांनी मोठय़ा प्रमाणात दर आकारुन निविदा मान्य करून घेतल्याच्या तक्रारीचा समावेश आहे. एन 95 मास्कचे प्रत्यक्ष उत्पादन मूल्य, बाजारातील दर व पुरवठादारास मान्य केलेला दरामध्ये मोठी तफावत आहे. हे सर्व साहित्य, उपकरणे, औषधांच्या खरेदीमध्ये झालेल्या या तफावतीची तपासणी करावी. अनावश्यक खरेदीची तपासणी करावी, प्रचलित बाजारभावापेक्षा जास्त दराच्या निविदा मान्य झाल्या असल्यास ही बाब कोरोनाच्या परिस्थिताचा गैरफायदा घेण्यासाठी केली आहे. त्याची चौकशी करून कारवाईची मागणी होत होती.
अतिरिक्त रक्कम नियमानुसार वसुलीचे निर्देश
जिल्हाधिकार्यांनी तक्रारीची दखल घेत विविध साहित्य पुरवठादारांनी मान्य करून घेतलेल्या दराची तुलना खुल्या बाजारातील दर व उत्पादन मुल्यांशी करुन यामध्ये तफावत असल्यास संबंधीत पुरवठादारास कोणत्याही स्थितीत देयके अदा करू नयेत, असे निर्देश दिले आहेत. पुरवठय़ाचे एकूण मूल्य, योग्य दराने परिगणीत केल्यानंतर शिल्लक रक्कम अदा करावी. परंतु, अशा पुरवठादारांना पुरवठा केलेल्या सर्व बाबीची संपूर्ण देयक यापूर्वीच अदा केली असल्यास अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडून नियमानुसार वसुलीचे निर्देश दिले आहेत.
फसवणूक करणार्यांना काळ्या यादीत टाका : जिल्हाधिकारी
शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांना काळया यादीमध्ये समाविष्ठ करावे, साहित्य, उपकरणाची अनावश्यक रित्या जादा दराने खरेदी झाली असल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करावी. साहित्याचा विनियोग योग्य रित्या झालेला नाही, असे निदर्शनास आल्यास त्याबाबतही जबाबदारी निश्चित करावी, असे नमूद केले आहे.
अधिकार्यांची बैठक घेतल्यानंतरच चौकशीचे निर्देश
कोरोना काळात झालेल्या या प्रकाराची जिल्हाधिकार्यांनी दखल घेतली आहे. गुरूवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता, शासकीय हॉस्पिटल्सचे औषध भांडारातील प्रमुख यांची बैठक जिल्हाधिकाऱयांनी घेतली. त्यानंतर रात्री उशिरा यासंदर्भातील चौकशी करून फौजदारी कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.