चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठी ताकद मिळाली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. यापुढे कार्यकर्त्यांची मोट बांधून हातात हात घालून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. गोपाळराव पाटील यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. दरम्यान भाजपमध्ये योग्य मान, सन्मान मिळाला नसल्यामुळेच काँग्रेसवापसी केली असल्याचे गोपाळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
चंदगड विधानसभा मतदार संघातील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह रविवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
भाजपला धक्का गोपाळराव पाटील यांचा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा गट आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसची ताकद वाढली आहे.