प्रतिनिधी / कोल्हापूर
अधिकाराचा गैरवापर करत शहरातील बडय़ा मिळकतधारकांना घरफाळात सवलत दिल्याप्रकरणी महापालिकेच्या घरफाळा विभागाचे 2 अधीक्षक, 1 करनिर्धारक संग्राहक व 1 लिपिक अशा एकुण चौघांवर फौजदारी गुन्हा शनिवारी रात्री दाखल झाला. या चौघांनी संगनमताने 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रुपयांचा घोटाळा करून मनपा प्रशासनाची फसवणूक केली. याबाबत महानगरपालिकेचे करनिर्धारक व संग्राहक संजय शिवाजीराव भोसले (रा.भोसलेवाडी, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीसात फिर्याद दिली आहे. या घोटाळयामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये, महानगरपालिकेचे 2 अधीक्षक यामध्ये नितीन राजाराम नंदवाळकर (वय 48, रा.ब्रम्हपुरी, शिवाजी पुल, कोल्हापूर), अनिरुध्द प्रमोद शेटे (वय 35, रा.शिवाजली अपार्टमेंट, घाटगे कॉलनी, लिशा हॉटेलसमोर, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तसेच करनिर्धारक व संग्राहक दिवाकर बापूसो कारंडे (वय 52, रा.तिवले गल्ली, कळंबा, ता.करवीर, जि.कोल्हापूर), लिपिक विजय तुकाराम खातू (वय 52, रा. नारायण सासणे नगर, जरगनगर रोड, कोल्हापूर) आदींचा समावेश आहे. या चौघांपैकी कोणासही रात्री उशीरापर्यंत अटक केलेली नव्हती.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, या चौघांनी शहरातील बडया कुळ वापरातील मिळकत धारकांना भाडे करारनुसार आकारणी न करता कमी भाडे आकारणी करून, मिळकतीच्या अनधिकाराने कर कमी करणे, आकारणी निश्चित झालेल्या करामध्ये मोठया रक्कमेत सुट घालणे, प्रत्यायोजीत केलेल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करून बडया मिळकत धारकांना संगमताने सवलत देत स्वतःच्या फायद्यासाठी मनपाच्या संगणकीय घरफाळा यंत्रणेत चुकीच्या नोंदी घालून कागदोपत्री फेरफार करीत केलेल्या घोटाळयामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली.
महापालिकच्या उत्पन्नाचा एक भाग म्हणून घरफाळ्या विभागाकडे पाहिले जाते. या विभागाकडे शहरातील सुमारे एक लाख 44 हजार मिळकतीची नोंद आहे यापैकी 25 हजार मिळकती व्यवसाय आहेत. त्यातील अनेक मिळकतधारकांना घरफाळा विभागातील काही जणांनी कोटय़ावधीची सवलत दिल्याचे आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार ,कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील आदींनी अनेकवेळा आयुक्तांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यामध्ये 21 तक्रार याची पडताळणी महापालिकेने केली. यापैकी 14 तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचे उघड झाले. त्यानुसार आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चौकशी समिती नेमुन त्वरीत अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार नेमनुक केलेल्या समितीच्या तपासणीमध्ये महापालिकेच्या घरफाळा विभागाचे 2 अधीक्षक, 1 करनिर्धारक संग्राहक व 1 लिपिक या चौघांनी संगणमत करून 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रुपयांचा घोटाळा उघडकीस आले. त्यानुसार शनिवारी रात्री महानगरपालिकेचे करनिर्धारक व संग्राहक संजय शिवाजीराव भोसले (रा.भोसलेवाडी, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीसात फिर्याद दिली आहे.