शिरोळ / प्रतिनिधी
नांदणी (ता.शिरोळ) येथे घशात लिंबू अडकून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. मयुरेश विशाल पलसे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे नांदणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदणी येथील नादणी जयसिंगपूर मार्गावर पलसे कुटुंबीय राहते. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तिची आई जेवण करत होती, तर वडील विशाल घराच्या दारात बसले होते. या दरम्यान, मयुरेश खेळत असताना घरात पडलेला लिंबू त्याने तोंडात घातला आणि तो त्याच्या घशात अडकला.
पालकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याला तत्काळ गावातील दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी जयसिंगपूर येथे नेण्यास सांगितले. नंतर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र घशात लिंबू अडकून श्वास गुदमरल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.